नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले – ‘तुमचं मुंबई मॉडेल खोट, इथल्या रुग्णांची नोंद पुण्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांचा विस्फोट झालेल्या मुंबईतील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. मुंबई महापालिकेकडून तातडीने उपाययोजना करत येथील परिस्थिती आटोक्यात आणली आहे. मुंबई पॅटर्नचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले आहे. तसेच केंद्र सरकारच्या नीती आयोगाने देखील कोरोना व्यवस्थापनाचे मुंबई मॉडेल प्रेरणादायी असल्याचे म्हणत बीएमसीचे कौतुक केले आहे. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. देशात नवाजला जाणारा ठाकरे सरकारचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. आता राणे यांच्या या आरोपाला शिवसेना आणि महाविकास आघाडीचे इतर नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले आहे. ठाकरे सरकार मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून येथील आकडा कमी भासवत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच मुंबई पॅटर्न आहे का? अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली आहे. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर केले जातात म्हणजे त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवले जात नाही. केवळ त्यांची नोंद इतर शहरांच्या कोरोना आकडेवारीत केली जाते. त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त राहतो, असे राणे यांनी सांगितले.