‘मातोश्री’ वरुन आदेश देणं सोपं, आता द्यावी लागणार ‘ही’ उत्तरं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘विधिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची वेगळी आहे. मातोश्रीमध्ये बसून आदेश सोडणं सोप्पं असतं, विधिमंडळात प्रश्नांची अधिकृत उत्तरे द्यावी लागतात. अशी खोचक टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ‘आता विधानसभेचं घोडा मैदान दूर नाही, आम्ही विरोधक म्हणून महाराष्ट्राच्या न्यायहक्कासाठी गोळा बारुद घेऊन सज्ज आहोत’, असा इशारा ही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. शपथविधीनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी विधानभवनात पहिल्यांदा आमदार म्हणून पाऊल ठेवणाऱ्या आदित्य ठाकरेंना देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

राणे म्हणाले की, मला अभिमान आहे, मी ज्या पक्षाच्या आमदारकीची शपथ घेतली त्या पक्षाने कोणाची लाचारी केली नाही. जेव्हा आमच्याकडे समर्थन नव्हतं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला तसं सांगितलं. त्यासाठी आम्हाला पंचतारांकिंत हॉटेलची गरज लागली नाही. आम्ही कोणाचे तळवे चाटले नाहीत, कोणाची लाचारी पत्करलेली नाही अशा तीव्र भाषेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच भाजपासोबत आम्ही आहोत याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगत त्यांनी भाजपाबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले.

नितेश राणेंना अजित पवारांबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हटले की, राजकारण म्हटले की अनेक घडामोडी या घडत असतात त्यामुळे राजकारण हे होतच राहणार पण कुठलंही कुटुंब तुटता कामा नये असे ते म्हटले.

दरम्यान उद्या शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्याला आजपर्यंत दोन वेळेस मुख्यमंत्री पद शिवसेनेने म्हणजेच ठाकरे घराण्याने दिले आहे. ठाकरे घराण्यातून आजवर कुणी मुख्यमंत्री पदासाठी दावा केला नव्हता. परंतु या वेळेस ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. मुंबईत शिवतीर्थावर उद्या (२८ नोव्हेंबर) संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

याआधी भाजपने सरकार स्थापन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. २३ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा सत्ता समीकरणे बदलली आणि अवघ्या ७२ तासातच भाजपाचे सरकार खाली कोसळले. दरम्यान अजित पवारांनी राजीनामा दिल्याने आम्ही बहुमत सिद्ध करू शकत नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अखेर महाविकास आघाडीच्या हातात सत्ता आली आणि पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे राऊतांचे विधान खरे ठरले.

Visit : Policenama.com