Belgaum Bypoll : गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नका – संजय राऊत

बेळगाव : वृत्तसंस्था – शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर होते. नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते फक्त विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये. असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?
भाजपने बेळगावात ताकद लावली वा काँग्रेसने इथे ताकद लावली तर आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. ते राष्ट्रीय पक्ष आहेत. मात्र महाराष्ट्रातील नेत्यांनी मग कोणत्याही पक्षाचे असोत, इथे येऊन मराठी उमेदवारा विरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नये. कोणीही असतील, मग ते काँग्रेसचे असतील किंवा भाजपचे, राष्ट्रवादी किंवा शिवसेना इथे मराठी माणसाच्या विरोधात प्रचार करणे शक्यच नाही. असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते इथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करतील असं मला वाटत नाही. कारण सीमा प्रश्न आणि इथल्या मराठी माणसाशी आपण एका भावनेनं बांधले गेले आहोत. परंतु भाजपचे लोक आहेत त्यांचा या चळवळीशी तसा संबंध नाही. भावनिक गुंतवणूक नाही. मात्र मराठी म्हणून तरी इथल्या बांधवांच्या विरोधात जाण्याचे पाप तुम्ही करू नका. नितीन गडकरी यांचा बेळगावात प्रचारासाठी येण्यामागचा उद्देश समजून घेतला पाहिजे.

नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते फक्त विदर्भाचे नेते नाहीत. ते महाराष्ट्राचेही नेते. महाराष्ट्रात सीमा भाग यावा, असा ठराव गडकरी मंत्री असतानाही झाले आहेत हे त्यांनी विसरू नये. आजही प्रत्येक विधानसभा अधिवेशनात सीमा भाग महाराष्ट्रात यावा हा ठराव करीत असतो. माझं सर्व नेत्यांना आवाहन आहे की, मराठी माणसाची एकजूट इथे आहे त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करून नका. जर मदत करता येत नसेल तर निदान तोडफोड तरी करू नका, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.