गोपीनाथ गडावरील मेळाव्याच्या पूर्वसंध्येला पंकजा मुंडेंचे मोठं वक्तव्य

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे या राजकारणापासून दूर होत्या. त्यानंतर त्यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पंकजा मुंडे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, आज त्यांनी आपले मौन सोडले आहे. फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी बोलणार असल्याचे सांगितले. उद्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी त्या परळीत आल्या आहेत.

परळीत आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी अनेक प्रश्नांना मोकळी आणि रोखठोक उत्तरे दिली. माझ्या बोलण्याने भूकंप होणार अशा चर्चा होत असताना त्या म्हणाल्या की, भूकंप हा कधीच चांगला नसतो. पण उद्या कुणाची हानी होणार नाही असा भूकंप करणार असल्याचे मोठं वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे उद्या नेमका कोणता भूकंप पंकजा मुंडे करणार यावर तर्तवितर्क लढवले जात आहेत.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, मी पक्ष सोडणार याची चर्चाच कशी झाली याचं मला आश्चर्य वाटतं. मी कधीही तसं म्हटलं नाही किंवा संकेत दिले नाहीत. मी पक्षासाठी सतत झटत असते. भाजपमधले मोठे ओबीसी नेते पराभूत झाल्यामुळे काही वेगळी चर्चा सुरु झाली. हे नेते पराभूत झाले हे मात्र सत्य आहे. त्याचा सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं कधीही म्हटलेलं नाही. ते मुद्दाम पसरविण्यात आल्याने प्रचंड त्रास झाल्याचे पंकजा यांनी सांगितले.

फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/