‘परळीत छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली’ ! पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. परळीमध्ये बहिण-भावामध्ये ट्विटरच्या माध्यमातून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमधून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय, जनतेने केलेले बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली होत असल्याचे पंकजा मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंकजा मुंडे यांनी इशारा देताना म्हटले आहे की, परळीत गुंडागर्दी, हप्तेखोरी, माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही’ अशी भाषा वापरायची ही दुटप्पी धोरणं असून गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैवी आहे. मात्र, हे खपवून घेतलं जाणार नाही, अशा भाषेत त्यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान, परळीमध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गाड्यांची तोडफोड झाली. हा गुंडगिरीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गाड्यांची तोडफोड करताना एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोणाची गय केली जाणार नाही असा इशारा ट्विटरच्या माध्यमातून दिला होता. मात्र बीडच्या पालकमंत्र्यांकडून छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली केल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

काहे प्रकरण आणि काय म्हणाले धनंजय मुंडे ?
परळीत टॉवर चौक परिसरात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी सोमवारी दुपारी एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर गाड्यांची तोडफोड केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गुंडगिरी करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हे फुटेज संपूर्ण परळीमध्ये व्हायरल झाले आहे.

या प्रकरणावर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून म्हटले की, परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही. 24 तासांच्या आत आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर 307 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अशा घटनेत आरोपींवर कडक कारवाई करण्याची सुचना बीड पोलिसांना देण्यात आली आहे. कृपया व्यक्तिगत भांडणात माझे नाव जोडण्याचा प्रयत्न करु नये ही विनंती, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.