बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत 22 जणांचे मृतदेह; पंकजा मुंडे संतप्त होऊन म्हणाल्या…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेतून 22 मृतदेहांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘बीड जिल्ह्यामध्ये सरकारने अत्याचार करायचे ठरवले आहे. प्रशासनाने हात टेकले आहेत. ही परिस्थिती बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आताच्या वर्तमान कोरोना परिस्थितीसाठी अतिशय भयानक आहे’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

 

 

बीडमध्ये 22 मृतदेह सामानाप्रमाणे रुग्णवाहिकेतून नेण्यात आले होते. याचे वृत्त माध्यमांमध्येही झळकत होते. त्यावर आता पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, ’22 लोकांचा मृतदेह सामानाप्रमाणे कोंबून भरून अंत्यविधीसाठी पाठवण्यात आला होता. ही एक भयानक घटना अजून कुठली नसून माझ्या बीड जिल्ह्याची आहे. या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करावं की संताप व्यक्त करावं हे मला कळत नाही. बीड जिल्ह्यामध्ये सरकारने अत्याचार करायचं ठरवलं आहे. प्रशासनाने हात टेकले आहेत. ही परिस्थिती बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आताच्या वर्तमान कोरोना परिस्थितीसाठी अतिशय भयानक आहे.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: जातीने बीड जिल्ह्याकडे लक्ष द्यावे. त्यांनी ज्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे ते त्यांचे योग्य कर्तव्य बजावत नाहीत, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

पाया पडल्याशिवाय रेमडेसिव्हिर मिळत नाही

परळीच्या डॉक्टरला कोविड झाला आहे आणि त्याला स्वतःला रेमडेसिव्हिर मिळत नाही. तो स्वतः चार डॉक्टरांना विचारत आहे. लोकांना पाया पडल्याशिवाय रेमडेसिव्हिर मिळत नाही. डॉक्टर दहशतीमुळे बोलत नाहीत. चौकशीमध्ये सर्व इकडेतिकडे करण्याची प्रथा असल्याने बीडमधील या प्रकरणाच्या चौकशीमध्ये काहीच समोर येणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.