मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर ! राज ठाकरेंच्या भेटीनंतर आ. लाड यांचे सूचक विधान

पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे आमदार प्रसाद लाड ( prasad lad) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शनिवारी (दि. 23) भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड ( prasad lad) यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसेल आणि योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

आमदार लाड म्हणाले, आजची भेट ही केवळ वैयक्तीक आणि मैत्रीची भेट होती. राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळेच त्यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणूक भाजप ताकदीने लढविणार आहे. भाजपने आपलाच झेंडा महानगरपालिकेवर फडकाविण्याचा निश्चय केला आहे. शिवसेनेची परंपरागत असलेली सत्ता आम्ही काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी जे लोक आमच्यासोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. मनसेसोबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही आमदार लाड यावेळी म्हणाले. आमदार लाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटर्तीय समजले जातात.