ठाकरे सरकारवर प्रवीण दरेकर यांची जहरी टीका, म्हणाले – ‘शिवसेनेनं करून दाखवलं, मुंबईची केली तुंबई’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या मुसळधार पावसामुळे राज्यात हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबईत पावसानं रौद्र रुप धारण केलं आहे. मुंबईत सगळीकडे पाणी पसरले आहे. दरम्यान यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे विरोधकांनी आता शिवसेनेला धारेवर धरले आहे. भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेनं करून दाखवलं अशी उपरोधिक टीका केली आहे.

शिवसेनेनं करून दाखवलं मुंबईची तुंबई केली, अशी टीका दरेकर यांनी केली आहे. तसेच ते म्हटले की शिवसेनेने वरवर काम केले मुळ विषयाकडे लक्षच दिले नाही. ते पुढे म्हणाले की, पाऊस पडल्यानंतर 7 ते 8 महिने काम करण्यासाठी अवकाश असतो परंतु काम करत नाहीत. 30 ते 40 वर्ष सत्ता उपभोगून काय केलं? असा थेट प्रश्न देखील प्रवीण दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, त्यांनी अनेक विषयांवर महाविकास आघाडी सरकारला फटकारले. काल सरकारनं मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांच्या सवलती दिलेल्या आहेत त्यावर ते समाधानी नाहीत. तर मराठा समाजाला चांगले पॅकेज देणे गरजेचे आहे. मराठा समाजाचा आवाज रोखण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. मराठा समाजाला मलमपट्टी लावायचं काम सरकारकडून होत आहे अशी जहरी टीका देखील दरेकर यांनी केली.

प्रवीण दरेकरांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
– एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या सन्मानार्थ केंद्रीय समिती आहे. म्हणून याबद्दल बोलणे मला उचित वाटत नाही.
– शरद पवार यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस जाणं ही नित्याची प्रक्रिया झाली पाहिजे. विरोधकांना त्रास देण्याचा केंद्र सरकारचा कोणताही हेतू नाही.
– सरकार ज्याप्रमाणे कारखाने आणि शेतकर्‍यांना मदत करते. तशीच मदत ऊस कामगारांनाही करावी. सरकारने असे केले नाही तर विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही जाब विचारू.
– नाबार्डने काल गृहनिर्माण संस्थाच्या स्वयं पुनर्विकास प्रकरणांना अर्थ पुरवठा करण्यासाठी जी निर्बध घातली आहेत. ती बंधने उठविण्यासंदर्भात नाबार्डच्या महाव्यवस्थापकाची भेट घेतली.
– पुनर्विकासासाठी 1600 प्रस्ताव प्राप्त झाले असून नाबार्डने त्यांना प्रतिबंधित केले आहे. याचा कोणाशीही संबंध नाही. या योजनेवर अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह होते. आज नाबार्डला त्याविषयी माहिती दिली. भाजप-शिवसेना सरकारच्या काळात यास सरकारी योजनेचे नाव मिळाले.
– कंगनाच्या चौकशीला काहीच हरकत नसून कंगना ड्रगिस्ट असेल तर तिची देखील चौकशी व्हायला हवी.