‘इम्तियाज जलली यांचं वक्तव्य मूर्खपणाचे, बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन तुलनाच अयोग्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारने सर्व सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. तसेच साधेपणाने ईद साजरी करण्यात यावी, असे आवाहन राज्य सरकारने केले असून नियमावली जाहीर केली आहे. यावरुन एमआयएम खासदार इम्तियाज जलील हे आक्रमक झाले आहेत. ही नियमावली मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करा, असा सल्ला दिला जातो. मग पंतप्रधान मोदी 5 ऑगस्टला ज्या कार्यक्रमाला जाणार आहेत. तो कार्यक्रम दिल्लीत बसून प्रतिकात्मक का केला जात नाही, असा सवाल जलील यांनी केला आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या टीकेवर आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आणि जातीय विद्वेषातून असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन यांची तुलनाच अयोग्य आहे. औरंगाबाद मनपा निवडणुकीत मतांसाठी जलील यांनी असं वक्तव्य केल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ईदसाठी ऑनलाइन खरेदी विक्री करण्यात यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यावर जलील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ज्यांना शक्य असेल, ती मंडळी ऑनलाईन खरेदी, विक्री करु शकतील. पण एक-दोन जनावरं असलेल्या व्यक्तींनी काय करायचे ? नेते, अधिकारी याच्याकडे स्मार्टफोन असतात. गरिबांकडे ती सोय नसते. त्यांचा विचार कोण करणार ? जनावरं विकून दोन पैसे मिळवणाऱ्यांचा विचार कोणी करायचा, असे प्रश्न जलील यांनी उपस्थित करत बकरे ऑनलाईन प्रक्रियेला त्यांनी विरोध केला आहे.