तुम्ही फक्त ‘कोरोना’वर लक्ष केंद्रीत करा, बुलेट ट्रेन नागपूरलाही नेऊ, भाजपचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरला बुलेट ट्रेनने जोडले असते, तर मला अधिक आनंद झाला असता, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दरम्यान म्हटले होते. यावर भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. दरेकर म्हणाले, प्रत्येकाला जगण्याची चिंता आहे. लोकांच्या जिवीताचे लक्षण करण्यातं सरकारने प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी कोविडवर फोकस करावा. बुलेट ट्रेन नागपुरलाही नेऊ असा टोला त्यांनी लगावला.
खेड तालुक्यातील चाकण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता.

त्या पीडित कुटुंबाची दरेकर यांनी आज (रविवार) भेट घेतली दोषींना फाशीची सुनावण्यात यावी, अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दरेकर यांच्याकडे केली. यानंतर दरेकर यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त रामथान पोकळे यांची भेट घेतली. देशात कायद्याचे राज्य आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळला पाहिजे. दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी पोलिसांना केली. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील सत्ता तीन चाकांवर असली तरी त्याचे स्टेअरिंग माझ्या हाती आहे. इतर दोन पक्ष मागे बसले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाखतीत म्हणाले. त्यावर दरेकर म्हणाले, सरकारची गाडी किती चाकी आहे, पुढे व मागे कोण बसलंय, गाडी खड्यात आहे की बाजूला जातेय, यापेक्षा कोविडचा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन सर्वांना बरोबर घेऊन कोविडच्या संकटाला सामोरे गेले पाहिजे. जातीने लक्ष देऊन उपाययोजना केली पाहिजे. वेळेत नियोजन झाले नाही तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल असे दरेकर म्हणाले.