‘आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो का ?’, भाजपाच्या ‘या’ नेत्यानं संजय राऊतांना सुनावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई ( Mumbai ) महापालिकेच्या निवडणुकीवरून शिवसेना ( Shivsena) आणि भाजपमध्ये( BJP) वाकयुद्ध सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी मुंबईत भाजपचा भगवा फडकवणार असं विधान केलं होतं. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवणं सोडा, हातही लावता येणार नाही, असा टोला लगावला होता. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत यांच्या या विधानानंतर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar) यांनी टीका करताना म्हटले की, संजय राऊत यांची पूर्णपणे आत्मविश्वास हरवलेली बॉडी लँग्वेज आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. भगवा काही पेटंट दिला का? आम्ही काही मेलेल्या आईचं दूध प्यायलो का? जनता ठरवणार भगवा कोणाच्या हातात द्यायचा. छत्रपतींचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा फक्त शिवसेनेचा नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.

त्याचबरोबर ऊर्जा खात्याच्या निधीवरूनदेखील त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. काँग्रेसची प्रतिमा उतरावी म्ह्णून प्रयत्न सुरू आहे. नितीन राऊत केवळ काँग्रेसचे आहेत म्हणून त्यांना तोंडावर आपटवण्याचे काम त्यांच्या महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांनी केलं का? काँग्रेसने अशी फरफट करून घेऊ नये, असंही प्रवीण दरेकर म्हणाले. ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, उधळून लावू असा इशारा भाजपने दिला आहे. सरकारने वीजबिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र, या काळात ग्राहकांना धोका देणे सरकारला शोभत नसल्याचेदेखील त्यांनी म्हटले.

कंगनाला पाठिंबा नव्हे, तर तिच्या बांधकामावर कारवाई करण्यास विरोध
मुंबईला पीओके म्हणणाऱ्या नटीचं समर्थन करणाऱ्यांच्या हातात मुंबई देणार का? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला होता, त्यावर कंगनाच्या पाकव्याप्त काश्मीर या भूमिकेला समर्थन नाही. मात्र, कंगनाची भूमिका पटली नाही म्हणून कंगनाचं बांधकाम तोडणार या प्रवृत्तीला विरोध केला असल्याचेदेखील यावेळी प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते संजय राऊत?
भाजपला मुंबईतील आर्थिक उलाढालींमध्ये, शेअर बाजारामध्ये, जमिनींमध्ये रस आहे. त्यांना मुंबईला दिल्लीचं पायपुसणं बनवायचं आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. कोणाच्या १०० पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महापालिकेवरून शिवरायांचा भगवा कोणी खाली उतरवू शकत नाही. भाजपला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती मिळवण्यासाठी १०६ हुतात्मे झाले आहेत. दिल्लीतून किंवा केंद्र सरकारकडून जेव्हा केव्हा मुंबईवर संकट आलंय, तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. त्यात शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आहेत. शुद्ध भगवा फडकवण्याच्या गोष्टी करणाऱ्यांनी हा इतिहास चाळावा, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.