मुख्यमंत्र्यांचा ‘रिमोट’ कोण चालवतं यापेक्षा राज्याचा ‘विकास’ महत्वाचा, विखे पाटलांची सरकारवर ‘टीका’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकासआघाडीच्या सरकारला खोचक टोला लगावला आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील महाविकासआघाडीवर टीका करताना म्हणाले की मुख्यमंत्र्यांचा रिमोट कोण चालवतंय यापेक्षा महत्वाचा आहे तो राज्याचा विकास. मूळ विषयांना बगल देणं थांबवा.

यावेळी विखे पाटील शिर्डीत बोलत होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढत असल्याचे सांगत लक्ष वेधताना त्यांनी काही सवाल उपस्थित केले. ते म्हणाले की, अतिवृष्टीच्या पंचवीस हजार रुपयांच्या मदतीचे काय झाले? सातबारा कोरा करण्याच्या अश्वासनाचे काय झाले? नाईट लाईफची चिंता करण्यापेक्षा शेतकऱ्यांची चिंता करा असा सल्ला देखील विखे पाटलांनी महाविकासआघाडी सरकारला दिला. तीन तिघडी आणि काम बिघडी असं काहीसं हे सरकार असल्याचेही विखे पाटील म्हणाले. नव्या सरकारला राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी विखे पाटलांनी शुभेच्छा देखील दिल्या.

पंकजा मुंडेंच्या आंदोलनाला पाठिंबा –

लोकांना दिलासा देण्यापेक्षा अडचणी वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे देखील सांगितले. मागील सरकारने सुरु केलेल्या योजना बंद करण्याचा ठाकरे सरकारने सपाटा लावला आहे. अद्याप कोणत्याही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. मराठवाडा वॉटर ग्रीड कामाला गती देण्याची आवश्यकता असताना स्वर्गीय बाळासाहेब विखेंना श्रेय जाईल म्हणून सर्वांनी विरोध केला आहे. परंतु पाण्याचा प्रश्नासाठी सर्वजण भांडत आहेत हे पाहून आनंद झाल्याचा उपहासात्मक टोला विखे पाटलांनी लगावला.

गोदावरीची तूट भरुन काढली तर नगर, नाशिकसह मराठवाड्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. प्रादेशिक वाद निर्माण करण्यापेक्षा सरकारने पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

You might also like