खाकीवर उचलला भाजप पदाधिकाऱ्याने हात

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाईन – भुसावळ येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी वाहन आडवाल्याच्या कारणावरून पोलिसांशी हुज्जत घालून थेट पोलीस निरीक्षकांच्या वर्दीवरच हात घातल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर वर्दीत असलेल्या पोलिसांनी देखील या पदाधिकाऱ्याला चांगल्याच खाक्या दाखवत कायद्यापेक्षा मोठे कुणी नसल्याचा प्रत्यय दिला आणि अटक केली  पण या पदाधिकाऱ्याला अटक करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिसाची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील शिवाजी चौकात भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांची कार तपासणीसाठी आणि सीटबेल्ट न लावण्याच्या कारणावरून वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी कार थांबवण्यासाठी सुचना केली पण त्यांनी वाहन न थांबवल्यानं पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून ते बाजार समितीजवळील मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांची कार अडवली. कार अडवली म्हणून वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विजय निकम आणि भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यात पंचायत समितीसमोर वाद सुरू झाली. त्याचवेळी नरेंद्र पाटील यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल उर्फ राजू चिरंजीलाल शर्मा यांना फोन लावून बोलावलं तर निकम यांनीही निरीक्षक किसन नजन पाटील यांना फोन करून घटना सांगताच तेही घटनास्थळी आले.

यावेळी नरेंद्र पाटील, अनिल शर्मा आणि किसन नजन पाटील या दोघांमध्ये भांडण झालं त्यात अनिल शर्मा यांनी नजन पाटील यांची कॉलर पकडताच पोलिसांनी या दोघा आजी-माजी शहराध्यक्षांना चोप दिला. यात पोलीस निरीक्षकांच्या हाताला जखम झाली.

शहरात घटनेची वार्ता कळताच पोलीस ठाण्याभोवती गर्दी जमल्यानं एसआरपी प्लाटूनची एक तुकडी बोलावून शहर पोलीस ठाण्यातील गर्दी पांगवण्यात आली. पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार कैलास पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

दरम्यान, कॉन्स्टेबल विजय निकम यांच्या फिर्यादीवरून भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील, भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल शर्मा आणि भाजपचे कार्यकर्ते मनीष पारीख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकारण जिंकले, अधिकारी हरले ; पाटील यांची बदली
चोपडा येथील पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण करून दुखापत केली होती. परिणामी भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्याचा बदला म्हणून राज्यातील सत्तेचा उपयोग घेत पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची बदली करवून आणली. चोपड्यात राजकारण जिंकले, अधिकारी हरले अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील हे ‘गुंड’ असल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ म्हणाले होते. तसंच त्यांच्या बदलीची मागणी देखील आपण करणार असल्याचं वाघ यांनी गुरुवारी सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज पोलीस निरीक्षक पाटील यांची जळगाव पोलीस नियंत्रण कशात बदली झाल्याचं आदेश चोपडा शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री प्राप्त झाले.
डॅशिंग पाटील यांचा कार्यकाळ
पोलीस निरीक्षक पाटील यांचा चोपड्यातील दोन वर्षांचा कार्यकाळ सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरला होता. अवैध धंदे तसंच गुंडगिरी मोडून काढण्याचं काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केलं. एक कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. परंतु राजकारणापुढे सर्वांचीच हार होते तशी पोलीस निरीक्षक पाटील यांच्याबाबतीत देखील घडलं. त्यांच्या बदलीचं वृत्त शहरात वाऱ्यासारखं पसरलं. सामान्य नागरिकांनी मात्र याबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे. तसंच भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा अशी देखील चर्चा नागरिकांमध्ये आहे.
पुण्यातही झाली होती अधिकाऱ्याची बदली
भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील आमदार योगेश टिळेकर यांच्यावर 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची आज बदली करण्यात आली होती.
पोलीस दलात बदली होणे हे नेहमीचे आले. मात्र, ज्या अधिकाऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून गुन्ह्याचा चढा लावला त्या अधिकाऱ्याला सोडून जाताना खाकीतील माणसाला अश्रू अनावर झाले. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस स्थानकात मिलिंद गायकवाड यांनी निरोप दिला. आपल्या साथीदारांचे अश्रू पाहून मिलिंद गायकवाड यांनाही अश्रू रोखता आले नाही.