पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणी भाजप नेत्यासह 2 मुलांना अटक, प्रचंड खळबळ

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन – कोलकाता पोलिसांनी मोठी कारवाई करत पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणी भाजप नेते राकेश सिंह यांच्यासह त्यांच्या दोन मुलांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यातून मंगळवारी (दि. 23) सिंह यांना अटक केली आहे. राकेश सिंह यांची मुले बंगालमधून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले आहे.

भाजप युवा मोर्चाची कार्यकर्ती पामेला गोस्वामी हीला पोलिसांनी कोकेन आणि 10 लाखांच्या रोकडसह पकडले होते. 19 फेब्रुवारीला कोलकातामधील न्यु अलीपूर भागात तिच्या कारमध्ये कोकेन आढळले होते. कारवाईत गोस्वामीसह आणखी दोघांना अटक केली आहे. या ड्रग्ज प्रकरणात भाजपचे नेते राकेश सिंह यांचे नाव समोर आले आहे. राकेश सिंह पश्चिम बंगालचे प्रभारी आणि भाजपचे महासचिव असणारे कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय आहेत. यापूर्वीच त्यांना कोलकाता पोलिसांनी नोटीस बजावली होती. नोटीस आल्यानंतर सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या नोटिशीला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु, त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर राकेश सिंह यांच्यासह त्यांच्या दोन मुलांना अटक करण्यात आली आहे.