‘सरकार म्हणून तुम्ही कमी पडलात म्हणूनच…’

पोलिसनामा ऑनलाईन – सोनू सूदला भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खर्‍या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर आता भाजपा नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.

देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सारवासारव करण्यासाठी बोलावून घ्यायचे, उताणे पडल्यावर सुद्धा पाहा आमचे पाय वरच आहेत असे दाखवण्याचा साळसूदपणा करायचा ? तुम्ही सरकार म्हणून कमी पडलात म्हणूनच त्याला रस्त्यावर उतरावे लागले हे मान्य करण्याचा मोठेपणा कधी येणार?, असा सवाल राम कदम यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून राऊत आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

लोकडाउनमुळं मुंबईत अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचे काम करणारा अभिनेता सोनू सूद याला राजकारण्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनूच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर सोनू सूदने रविवारी रात्री ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे त्याने भेटीनंतर म्हटले आहे. स्थलांतरीत मजूर आणि माझे नाते खूप वर्षांपासूनचे आहे. स्थलांतरीत मजुरांसाठी केलेले कार्य फक्त एका राज्यापुरते मर्यादित नाही. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केले, अशी प्रतिक्रिया त्यानं भेटीपूर्वी ट्विटरवरून दिली होती.