‘ज्यांना जय श्रीराम म्हणण्याची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा’; भाजप नेत्याची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात केरळ, आसाम, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक चुरशीची होणार असून याठिकाणी भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. यातच आता शिवसेनेने प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेवर भाजपने हल्लाबोल केला आहे.

बिहारमध्ये शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत काही जागांवर निवडणूक लढवली होती. त्यामुळे शिवसेना पश्चिम बंगालमध्ये आपली ताकद अजमावून पाहणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, याच दरम्यान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.

शिवेनेवर गंभीर टीका करताना राम कदम म्हणाले, ज्यांना श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांनाच शिवसेना पाठिंबा देत आहे. अशी टीका कदम यांनी केली. तसेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शिवसेना का उतरत नाही ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. बिहारमध्ये एकाही जागेचे डिपॉझिट शिवसेनेला वाचवता आले नाही. त्यातून शिवसेनेने धडा घेत पश्चिम बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, असा टोला त्यांनी लगावला आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता तरी त्यांचे तिथेही डिपॉझिट वाचले नसते, असा चिमटा त्यांनी काढला.

ममता दीदी बंगालच्या खऱ्या वाघीण
पश्चिम बंगालमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार असल्याची चर्चा मध्यंतरी राजकीय वर्तुळात होती. मात्र, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन शिवसेना पश्चिम बंगालमधील निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.