शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय ही शरमेची गोष्ट, शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू : राम कदम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना महामारीत टाळेबंदीमुळे गेल्यावर्षीपासून सण, उत्सव हे बंद होते. शासनाकडून उत्सव साजरे करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु टाळेबंदी आता शासनाने उठवली असून, मात्र, राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे गृहविभागाने नव्याने आदेश बजावून यंदाची शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. तर यासंदर्भात शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी दिला आहे.

राम कदम ट्विट करत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी नाही? शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय ही शरमेची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे, आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का?, अशी विचारणा करत त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. तर शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत, अशी विचारणा राम कदम यांनी त्या पत्रातून केली आहे.

पुढे ते म्हणतात, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते. मात्र हिंदुत्ववादी स्वराज्य ज्यांनी सुरू केले. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतेय आणि ही शरमेची गोष्ट आहे. तसेच गेल्या काही दिवसात सातत्याने महाराष्ट्रात हिंदूंची गळचेपी होताना दिसते. पालघरमध्ये साधूंवर हल्ला झाला. मात्र, राज्य सरकारने ठोस कारवाई केली नाही. तांडव या वेबसीरिजच्या माध्यमातून हिंदू देवदेवतांचा अवमान केला. पण, सरकार गप्प बसले. आता तर शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घालून पुन्हा एकदा हिंदूंचा अवमान करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.