संजय राऊतांनी बोलण्यावर मर्यादा ठेवावी, सरकार नैतिकतेला धरून नसल्याचं भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारला आज बहुमत चाचणीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. तत्पूर्वी भाजपकडून सरकारवर टीका करायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी बोलण्यावर मर्यादा ठेवल्यास हिताचं होईल अशा शब्दात माजी राज्यपाल आणि भाजपचे जेष्ठ नेते राम नाईक यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.

कल्याणमध्ये आयोजित रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना नाईक यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मतदारांनी महायुतीला कौल दिलेला असताना राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार हे नैतिकतेला धरून नसल्याची टीका माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी आता गोव्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकीत केले होते त्याबाबत नाईक यांना विचारले असता संजय राऊत गोव्यालाच काय कुठेही जाऊ शकतील, मात्र अशी सगळी विधाने करताना राऊतांनी त्यांच्या बोलण्यावर मर्यादा ठेवल्या तर ते त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्याही हिताचे ठरेल, असे राम नाईक यांनी सांगितले. राज्यात मागील एक महिन्यात जे घडले ते योग्य नाही, असेही राम नाईक म्हणाले. मात्र दुसरीकडे आता जे होऊन गेले आहे. त्यावर अधिक चर्चा करत बसण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जायला हवे, असा सल्लाही राम नाईक यांनी दिला.

रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेचे कल्याणमध्ये आयोजन करण्यात आले होते. खाजगी तत्वावर सुरु असलेल्या या कार्यक्रमात वीज पुवठा खंडित झाल्याने ८५ वर्षांच्या राम नाईक यांनी मोबाईलच्या टॉर्चच्या सहाय्याने भाषण केले. कल्याणकरांनी देखील नाईक यांच्या या उमदेपणाला चांगला प्रतिसाद दिला.

Visit : Policenama.com