भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, ‘या’ माजी मंत्र्यानं थेट चंद्रकांत पाटलांना लगावला ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   विधान परिषदेचं तिकीट न मिळाळ्याने नाराज झालेल्या भाजपच्या नेत्यांची यादी आता वाढू लागली आहे. नाराज एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात खडाजंगी सुरु असतानाच आता माजी मंत्री राम शिंदे याचाही समावेश झाला आहे. राम शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी फेसबूक पोस्टचा आधार घेतला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा आधार घेत टोला लगावला आहे.

पंकजा मुंडे यांच्यामुळे रमेश कराड यांनी उमेदवारी मिळाली, पण त्याच्यासहित इतरांना मिळाली नाही याची खंत राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे. राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात पराभव केला. पराभवानंतर शिंदे यांनी त्यांच्याच पक्षातील राधाकृष्ण विखे पाटील यांना पराभवासाठी जबाबदार ठरवत जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
फेसबुक पोस्टमध्ये राम शिंदे म्हणतात…

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानपरिषदेसाठी नेते, इच्छूक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील, असे म्हटले आहे. त्या अनुषंगाने मा. पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास (त्यामुळे श्री रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली) केला. जो मला आणि इतरांना जमला नाही, असं राम शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भाजपमध्ये गृहकलह

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांनी पक्षात मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असा सल्लावजा टोला लगावला होता. चंद्रकांत पाटलांच्या विधानावर एकनाथ खडसे यांनी भाष्य करताना पाटलांना भाजपमधील कामाची आठवण करून दिली. खडसे म्हणाले, आज चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शकाची भूमिका बजावत असले तरी त्यांच्या अगोदर मीच ती भूमिका बजावत होतो आणि मला सांगितलं तर पुढेही बजावत राहील.