शरद पवार यांनी केलेल्या ‘त्या’ विधानावरून भाजपाचे नेते राम शिंदेंचा निशाणा, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले ते अनावधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असे मला वाटते. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा असा नामोल्लेख करणे ही गंभीर चूक असून हा अवमान असल्याची टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे.

जेजुरी येथे उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून पेटलेले राजकारण आता अधिकच तीव्र झाले आहे. पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार यांनी नातवाच्या प्रेमापोटी एक वक्तव्य केले. अहिल्‍यादेवींचा जन्म राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात झाला आहे, असे सांगून नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून झाला असल्याची टीका शिंदे यांनी केली आहे.