‘सिंचन घोटाळयाचा प्रमुख साक्षीदार फोडण्याचं राष्ट्रवादीचं काम, पण…’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
त्यातच आता माजी मंत्री राम शिंदे यांनी खडसे यांना निशाणा बनवत राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्या प्रकरणी प्रमुख साक्षीदार फोडले तरी आता त्यांचा उपयोग होणार नाही, या घोटाळ्यातील आरोपींवर निश्चित कारवाई होणार, असा टोला शिंदे यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

राम शिंदे यांनी सांगितलं की, एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे ते प्रमुख साक्षीदार असून, ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. ही चौकशी अंतिम टप्प्यात असतानाच राष्ट्रवादीने प्रमुख साक्षीदार फोडण्याचे काम केलं. मात्र, चौकशीत खडसेंची साक्ष होऊन गेल्याने, या साक्षीदाराचा उपयोग होणार नाही. म्हणून या घोटाळ्यातील दोषींवर निश्चित कारवाई होणार आहे, असे त्यांनी सांगितलं.

राजकारणात भरती, ओहोटी असे काही नसते, भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वाधिक राज्य, मुख्यमंत्री, खासदार आहेत, कधी नाही ते काँग्रेस वगळता कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हते ते नरेंद्र मोदी यांना मिळाले आहे. जयंत पाटील म्हणतात १० ते १२ आमदार त्यांच्या संपर्कात आहेत, पण एकही आमदार, माजी आमदार एकनाथ खडसे यांच्याबरोबर गेला नाही, कोणीही भाजप सोडणार नसल्याचा दावा राम शिंदे यांनी केला.

तुम्ही ‘ईडी’ लावली तर मी ‘सीडी’ लावेन -खडसे

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा सूड म्हणून त्यांनी माझी ‘ईडी’ मार्फत चौकशी लावली, तर मी त्यांची ‘सीडी’ लावेन. मग जे व्हायचे ते उघड होईल, असा इशारा राष्ट्रवादीत प्रवेश करताना जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी भाजपला दिला. भाजप सरकारच्या काळातील भूखंड गैरव्यवहारही उघड करण्याचे त्यांनी जाहीर केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत खडसे यांनी बुधवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी आपली कन्या रोहिणी आणि निवडक कार्यकर्त्यांसह शुक्रवारी राष्ट्रवादीच्या कार्यलयात पक्षप्रवेश केला. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.