‘कोंबड्या, मासे अन् मास्कही विकले’, भाजपच्या माजी मंत्र्याचे आ. रोहित पवारांवर गंभीर आरोप

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Rajendra Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कर्जत – जामखेडमधील मतदारांनी पवार कुटुंबीयांवर विश्वास ठेवून आमदार रोहित पवार यांना निवडून दिलं. मात्र आतापर्यंतच्या काळात त्यांनी उल्लेख करावा असं एकही भरीव काम केलेलं नाही. उलट बारामती भागातील आपल्या कंपन्या आणि संस्थांच्या वस्तू येथे आणून विकण्याचा व्यापारच वाढवला असा आरोप शिंदेंनी केला आहे.

‘नवीन काहीही कामं या भागात झाली नाहीत’
राम शिंदे म्हणाले, “गेल्या वर्षभरात आमदार म्हणून रोहित पवार यांची कारकीर्द कशी राहिली याचा लेखाजोखा मतदारांनी घेतला पाहिजे. गेल्या वर्षभरात या मतदारसंघातील मतदारांनी आपलं सर्वस्व गमावलं आहे. नवीन काहीही कामं या भागात झाली नाहीत. आपल्या काळात झालेल्या कामात खोडा घालण्याचं काम पवारांनी केलं. त्यामुळं हा भाग विकासापासून मागे खेचला गेला.”

‘कोंबड्यांची पिल्लं, स्वत:च्या नावानं मास्क, झाडांची रोपं, माशांची बीजं अशा अनेक वस्तू इथं आणून विकल्या’

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले असं पवार यांच्या बाबतीत म्हटलं पाहिजे. इथं सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी बारामती भागातील कंपन्या आणि संस्थांचा विविध प्रकारचा माल येथे आणून विकण्यास सुरुवात केली. कोंबड्यांची पिल्लं, पिठाच्या गिरण्या, स्वत:च्या नावानं मास्क, झाडांची रोपं, माशांची बीजं अशा अनेक वस्तू इथं आणून विकल्या आहेत.”

शिंदे म्हणाले, “एकवेळ हे करण्यास हरकत नाही. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामं करण्याचंही कर्तव्य असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. उलट लोकांना अपमानित व्हावं लागत आहे. निवडणुकीत जाहीर केलेले बारामीत पॅटर्न (Baramati Pattern) आणि नवे पर्व कुठेच दिसत नाही. पवार कुटुंबीयांना 50 वर्षांच्या कामाचा वारसा असल्याचं सांगतात, परंतु इथं तो दिसून येत नाही. त्यामुळं वर्षपूर्तीच्या वेळी आपण काय कमावलं, काय गमावलं याचा येथील मतदारांनी विचार केला पाहिजे” असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत प्रा. राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार निवडून आले होते. याला एक वर्ष झालं. हा पराभव शिंदेंच्या जिव्हारी लागला होता. याची सल त्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. निकालाला एक वर्ष पूर्ण होत असताना शिंदेंनी कर्जतमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत अनेक आरोप केले.

You might also like