पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळतं, रावसाहेब दानवेंची शरद पवारांना कोपरखळी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका प्रचार सभेत पावसात भिजत भाषण केलं होते. यावरू भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज (शुक्रवार) कोपरखळी मारली आहे. पावसात भाषण केल्यानं हमखास यश मिळतं, अशी खोपरखळी रावसाहेब दानवे यांनी मारली आहे. तसेच आता मी देखील पावसात भाषण केलं. पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार असाही आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

औरंगाबाद शहरात शुक्रवारी मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा पुतळा उभा करण्यात आला असून हा कार्यक्रम सुरु असतानाच पावसाला सुरुवात झाली. हरिक्षाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले. पावसात भाषण केल्यास हमखास यश मिळते, असा सणसणीत टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला. आता मी देखील पावसात भाषण केलं, पुढच्या वेळेस हमखास यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारचं स्टेअरिंग दोघांच्या हातात

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग दोन जणांच्या (शिवसेना-राष्ट्रवादी) हातात आहे. आणि तिसरा पार्टनर काँग्रेस मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असे सांगत आहे. दोघांच्या हातात स्टेअरिंग असल्याने ही गाडी झाडावर आदळणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे लायसन्स नाही की इन्शुरन्स देखील नाही, अशा शब्दात दानवे यांनी आघाडी सरकारवर विनोदी फटकारे मारले.

दुसरीकडे, शरद पवार यांच्यावर रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे. पावसात भाषण कधी करायचं, हे रावसाहेब दानवे यांना अजून कळणार नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.