संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ ! भाजप नगरसेवकासह 5 जणांची गोळ्या झाडून हत्या, मारेकरी देखील जखमी

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व वैमनस्यातून हल्लेखोरांनी घरात घुसून केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यु झाला आहे.

नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या (वय ५०), त्यांचा भाऊ सुनिल बाबुराव खरात (वय ५५), मुलगा सागर रवींद्र खरात (वय २४), रोहित ऊर्फ सोनू रवींद्र खरात (वय २०) आणि त्यांचा मित्र सुमीत फेडरे अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. पत्नी रजनी, दुसरा मुलगा हितेश आणि एक मित्र जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहेत. या घटनेत हल्लेखोरही जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

ही घटना नगरसेवक रवींद्र खरात यांच्या समतानगर येथील घरात रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, रवींद्र खरात व त्यांचे कुटुंबिय हे घरात असताना तीन ते चार जण बंदुक व सुरा घेऊन घरात शिरले. त्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरवात केली.  यावेळी त्यांची हल्लेखोरांबरोबर झटापट झाली. खरात कुटुंबातील लोकांनी केलेल्या प्रतिकारात तिघे हल्लेखोर जखमी झाले. हल्लेखोरांच्या गोळीबारात दोघा जणांचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोघे जण उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यु पावले. हा हल्लेखोर कोण हे अद्याप समजू शकले नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्यासह भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. घटनास्थळी सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. पोलिसांनी तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून तेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

रवींद्र खरात यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई देखील केली होती. काही दिवसांपूर्वी खरात यांच्या घरावर जमावाने दगडफेक करत गोळीबार केला होता. त्यात खरात थोडक्यात बचावले होते.

Visit : Policenama.com