पैसे दुप्पट करुन देण्याचे आश्वासन देणार्‍या भाजपच्या महिला अध्यक्षा रेखा जाधव पोलिसांच्या ताब्यात

कल्याण : पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून अनेक महिलांची कोट्यावधीची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी भाजपच्या महिला अध्यक्षा रेखा जाधव यांना ताब्यात घेतले आहे.

कल्याणमधील महिलांनी फुले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रेखा जाधव यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत राव, संदीप सानप आणि सुनील आव्हाड अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे आहेत.

रेखा जाधव यांनी १८ महिन्यात पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखविले. अशा प्रकारे त्यांनी तब्बल १ कोटी ७० लाख रुपये गोळा केले. मुदत संपल्यावर महिलांनी रेखा जाधव यांच्याकडे पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. याबाबत महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती.

फसवणूक झालेल्या या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांची भेट घेतली. त्यांनी गृहमंत्र्यांकडे या प्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.