‘आम्हाला माफ कर, राजकारण्यांमध्ये माणुसकी उरली नाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लॉकडाउमध्ये स्थलांतरित मजुरांना, कामगारांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याचे काम करणार्‍या अभिनेता सोनू सूदला राजकारण्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.‘सामना’ वृत्तपत्रातील लेखातून सूदच्या कामगिरीला अप्रत्यक्षपणे भाजपाचा पाठींबा असल्याचा संशय व्यक्त केला होता. यावर आता भाजपा प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी सोनू सूदला पत्र लिहित माफी मागितली आहे. ‘आम्हा राजकारण्यांमध्ये आता माणुसकी उरली नाही’, असे म्हणत सोनू सूदच्या कामगिरीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

‘मला माफ कर कारण मीसुद्धा या राजकीय व्यवस्थेचा एक भाग आहे. ही व्यवस्था प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करते. चांगल्या गोष्टीतही वाईट बघण्याची ही वृत्ती आहे. स्थलांतरितांच्या वेदनांबद्दल तू बोलत होतास. भुकेल्या मुलाला कडेकर उचलून मैलोनमैल चालणार्‍या माऊलीला पाहून तुझे डोळे पाणवले होते. आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरली नाही. आम्ही लोकांमध्ये त्यांचा जीव पाहत नाही, तर मतदार म्हणून त्यांचा आकडा मोजतो. आम्हाला लोकांच्या संवेदनशीलतेचा राग येतो, कारण आमच्यातील संवेदनशीलतेला आम्ही खूप आधीच मारून टाकले आहे. स्थलांतरित मजुरांचा रंग, धर्म, जात न बघता तू त्यांची मदत केलीस. हे आम्ही एकवेळ विसरू पण तू कोणाची भेट घेतलीस हे विसरणार नाही.

राज्यपाल तुला काय म्हणाले, हे ‘सामना’ला माहित आहे, पण या स्थलांतरितांकडून तुला आलेल्या हजारों मेसेजवर पडदा टाकतील. एक व्यक्ती बदल घडवून आणू शकतो हे तू सिद्ध केले आहेस तुझ्यासारखे लोक देशाला प्राधान्य देतात. तू खरा हिरो आहेस.’ सोनू सूदनेही या पत्रावर प्रतिक्रिया दिली. ‘आज वाचलेली ही सर्वांत सुंदर गोष्ट आहे. थेट तुमच्या मनातून भावना यात व्यक्त केल्या आहेत. धन्यवाद’, असे त्याने ट्विटरवर लिहिले आहे.