राजीव गांधींविरोधात बोलल्याने भाजपचे ‘हे’ नेते मोदींवर भडकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचत असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल मिस्टर क्लिन असलेले पाहता पाहता भष्ट्राचारी नंबर वन बनून त्यांचा जीवनकाळ संपला, अशी टिप्पणी केली होती. त्यावर चारही बाजूने टिका झाली. आता भाजपचे कर्नाटकचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास प्रसाद हे भडकले आहेत. त्यांनी मोदी यांच्यावर टिप्पणी करताना अशी विधाने अनावश्यक असल्याचे सांगितले.
राजीव गांधी यांच्यावरील टीकेला विरोध करणारे ते भाजपचे पहिले नेते आहेत.

श्रीनिवास प्रसाद यांनी सांगितले की, लिट्टेने योजना बनवून राजीव गांधी यांची हत्या केली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या कारणावरुन त्यांचा मृत्यु झाला नव्हता. कोणीही असे मानत नाही. माझाही त्याच्यावर विश्वास नाही. मी मोदी यांचा सन्मान करतो. परंतु, त्यांनी राजीव गांधी यांच्याविरोधात असे बोलले नव्हते पाहिजे.

कमी वयात राजीव गांधी यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही राजीव गांधी यांच्याबाबतीत चांगले उद्गार काढले होते.

श्रीनिवास प्रसाद हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते राज्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. श्रीलंकेतील तामिळ दहशतवाद मिटवण्यासाठी राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी श्रीलंकेच्या मदतीला शांती सेना पाठविली होती. त्याचा सुड घेण्यासाठी १९९१ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत तामिळ लिबरेशन टायगर या संघटनेने आत्मघातकी महिलेच्या माध्यमातून बॉम्बस्फोट घडवून राजीव गांधी यांची हत्या केली होती.