भाजपच्या ‘या’ दिग्गज नेत्यांकडून गुजरात सरकारला सल्ला, म्हणाले – ‘स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव मागे घ्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असे नामांतर केल्यानंतर विरोधकांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. असे असताना आता भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे, असा सल्ला दिला देत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून याबाबतचा सल्ला गुजरात सरकारला दिला आहे. गुजरातचा जावई या नात्याने राज्यातील अनेकांनी मला सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलल्याबाबत मला विचारणा केली. गुजरात सरकारने आपली चूक सुधारावी आणि स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदी यांचे नाव मागे घ्यावे. स्टेडियमला नाव देण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली नव्हती, हे देखील गुजरात सरकारने सर्वांसमोर स्पष्ट करावे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

दरम्यान गुजरातमधील पाटीदार समाज आणि काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोटेरा स्टेडियमच्या नावाला विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजपा सरकारचा हा निर्णय संतापजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. सरदार पटेल यांच्या नावाने मत मागणारी भाजपा, आता सरदार साहेबांचा अपमान करत आहे. गुजरातची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.