भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी साधला नाना पटोलेंवर ‘निशाणा’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डिझेल, पेट्रोल आणि गॅसची मोठया प्रमाणात वाढ झाली असून सामान्य लोकाना जगणे कठीण झाले आहे. ज्यावेळी केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार होते. त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे टिवटिव करत त्यांच्यावर टीका करत होते. आज ते गप्प का आहेत? महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. त्यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पटोले यांच्या भावनेतून आणि भाषेतून काँग्रेसचा खरा चेहरा व्यक्त होत आहे. काँग्रेसच वर्णन करायच झाल्यास, त्यांचा चेहरा लोकशाहीचा, आत्मा हुकुमशाहीचा आणि कृती परिवाराची सेवा करण्याची, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुनगंटीवार म्हणाले की, देशात काळे कायदे लागू झाले असे पटोले सतत म्हणतात. मात्र असे सांगताना ते काळे कायदे कोणते, याबद्दल ते काहीच सांगत नाहीत. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांपैकी 2 कायदे आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. पटोले मात्र याबाबत काहीच बोलत नाहीत, असे सांगताना केंद्राने केलेले कायदे काळे आणि यांनी तेच कायदे केले तर ते पांढरे कसे असा टोला मुनगंटीवार यांनी पटोले यांना लगावला आहे. जेंव्हा मावळातील शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. त्यावेळी पटोले काँग्रेसच्या विरोधात बोलत होते. काँग्रेस शेतकरीविरोधी आहे असे ते म्हणत होते. काँग्रेसचे शेतकऱ्यांबद्दलचं प्रेम पुतना मावशीच असल्याचे पटोले म्हणाले होते. त्यांचे 2009 मधील विधानसभेतील भाषण काढले तर त्यांचे काँग्रेसबाबत काय मत होत ते दिसून येईल, असे मुनगंटीवार म्हणाले.