मुनगंटीवारांची अजित पवारांवर खरमरीत टीका, म्हणाले…

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर खरमरीत टीका केली आहे. मुनगंटीवार म्हणाले की, सत्तेचा ताम्रपट हातातून जाऊ नये म्हणून अजितदादा भाजपाकडे आले होते. काही लोकं सत्तेत चिरंजीव होऊ पाहतात. सत्तेचा ताम्रपट नेहमी आपल्याकडेच कसा राहील याकडे त्यांचा कल असतो, मग पक्ष कुठलाही असो. असा आरोप त्यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.

तसेच मुनगंटीवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला की, ‘काकांनी आपला डाव टाकला म्हणून त्यांना सत्तेचा ताम्रपट आमच्याकडून घेवून शिवसेनेकडे जावं लागलं,’ असा निशाणा मुनगंटीवारांनी लगावला. तसेच ‘आम्ही सत्ता फक्त जनतेसाठीच वापरली’ असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनाच्या अनुपस्थितीबाबत मुनगंटीवार यांनी केला खुलासा
दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाच्या प्रदेश अधिवेशनाच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले की, ‘प्रदेशाध्यक्षांच्या रेस मध्ये मी कधीच नव्हतो. राजकीय पक्षाला प्रादेशिक संतुलन हे राखावेच लागते, त्यामुळे मी कधीच या शर्यतीत नव्हतो. दिल्लीत १४ फेब्रुवारी रोजी आम्ही सर्व एकत्र होतो. काही महत्त्वाच्या तीन महिन्यांआधीच ठरलेल्या भेटींमुळे मला मुंबईत अधिवेशनाला उपस्थित राहता आले नाही.’ असा खुलासा त्यांनी केला.

तसेच त्यांनी सांगितले की ‘पक्ष म्हणजे आमचा आत्मा आहे, त्यामुळे पक्षावर नाराज असण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. भाजपाचे अधिवेशन सुरु होण्याच्या काळातच तीन महिन्याआधीच काही पूर्वनियोजित बैठकांचे आणि भेटींचे नियोजन ठरल्यामुळे अधिवेशनाला हजर राहता आले नव्हते. तसेच पक्षाच्या अनुमतीनेच मी मतदारसंघात आहे’, असे देखील मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.