सुधीर मुनगंटीवार यांचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले- आमच्या आई- बहिणी सुरक्षित नसतील तर, एकच पर्याय अन् तो म्हणजे राष्ट्रपती राजवट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावात शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करणार असल्याचा ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या तिस-या दिवशी बुधवारी (दि.3) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. मुनगंटीवार म्हणाले की, आमच्या राज्यातील आई- बहिणींना नग्न करुन नाचायला लावल जात आहे. याचे सर्व व्हिडिओ असताना तुम्ही आम्ही नोंद घेऊ, असे सांगतात, अशी टीका मुनगंटीवार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केली आहे. यासोबतच आता राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. यासाठी मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई- बहिणी सुरक्षित नसेल, तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, असा सुधीर मुनगंटीवार यांनी इशारा दिला आहे. मुनगंटीवार यांच्या या मागणीनंतर या घटनेची चौकशी चालू आहे, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली. चौकशीनंतर दोन दिवसांत तात्काळ कारवाई करू असे आश्वासन देशमुख यांनी दिले. दरम्यान सामाजिक संघटनांनी मंगळवारी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यात संबंधित कृत्याचा व्हिडिओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.