‘थ्री इडीयट’मध्ये करीना परत येते तसं शिवसेनाही येईल !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस देखील वादळी ठरला. यावेळी विरोधकांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक पहायला मिळाली. शिवसेना आपल्याला सोडून इतरांसोबत सत्तेत सामील झाली याची सल अजूनही भाजपला आहे हे अनेक भाजप नेत्यांच्या बोलण्यातून आज जाणवले.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणांमधून शिवसेनेला चांगलेच टोले लगावले. आम्ही एकत्र सत्तेत असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही राज्याला कर्जमुक्तीच्या दिशेने नेले. परंतु सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावरील टवटवीतपणा गेला आहे. हे डेप्युटेशनवर असलेले सरकार आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी चिंतामुक्त व्हावं असा सल्ला देखील मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिला.

‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणत थ्री इडियट्स चित्रपटात ज्याप्रमाणे करीना कपूर पुन्हा येते त्याप्रमाणे शिवसेना आणि आम्ही परत एकत्र येऊ म्हणून मी शिवसेनेवर जास्त बोलणार नाही असे देखील मुनगंटीवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी दिला ‘सामना’च संदर्भ
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता मी सामना वाचायला लागलोय असे म्हणत सामना वृत्तपत्रातील जुने संदर्भ देत शिवसेनेने राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर केलेले आरोप वाचून दाखवायला सुरुवात केली आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. शरद पवार अफजल खान आहेत. शरद पावर महाराष्ट्राचे शत्रू आहेत. शरद पवार बकासूर आहेत,’ अशा आशयाच्या ‘सामना’तील बातम्या देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवल्या.

फडणवीस यांच्या या कृत्याबाबत हरकत घेत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सभागृहात वृत्तपत्राचा संदर्भ देऊ नये असे सांगितले तर मी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता असताना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मला ही सूचना दिली होती त्यामुळे या देखील सभागृहात त्याचे पालन व्हावे अशी मागणी केली.

‘ते’ शब्द अध्यक्षांनी रेकॉर्डवरून वगळले
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबाबत उच्चारलेले शब्द अध्यक्ष नाना पटोले यांनी रेकॉर्डवरून काढून टाकले आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा बोलण्यासाठी संधी दिली.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/