‘… म्हणून इच्छा नसताना देखील नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा केला स्वीकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘मी मुख्यमंत्रीपद स्वीकारावे म्हणून बराच आग्रह करण्यात आला. माझ्यावर बराच दबाव होता. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. मात्र, मला खुर्चीचा मोह नाही,’ असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले होते. त्यावर आता नितीश कुमार यांना इच्छा नसताना मुख्यमंत्री पद का स्वीकारावं लागलं? त्यामागचे कारण बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं आहे.

सुशील कुमार मोदी म्हणाले, “नितीश कुमार यांना मुख्यमंत्री नव्हतं व्हायचं. भाजप आणि जदयुच्या नेत्यांनी त्यांना म्हटलं, आम्ही तुमच्या नावावर व दूरदृष्टीवर निवडणूक लढवली आणि जनतेने त्यांच्यासाठी मतदान केले. जदयू, भाजपा व विकासशील इन्सान पार्टीच्या (व्हीआयपी) नेत्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा स्वीकार केला. तथापि, जदयूचे नेते म्हणाले की, अरुणाचल प्रदेशामध्ये झालेल्या गोष्टीचा परिणाम बिहार सरकार व बिहारमधील आघाडीवर होऊ देणार नाही. भाजपा-जदयू अतूट आहे. नितीश कुमार यांच्या मार्गदशनाखाली सरकार पाच वर्षे पूर्ण करेल,” असेही सुशील कुमार मोदी यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, नितीश कुमार यांनी पक्षाची धुरा रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर केलेल्या विधानामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘मला मुख्यमंत्रीपद नको. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मुख्यमंत्री कोणाला करायचे ते ठरवावे,’ असे नितीश कुमार म्हणाले. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यापुढे आता रामचंद्र प्रसाद सिंह संयुक्त जनता दलाचे नेतृत्व सांभाळतील.