उमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत म्हणाल्या…

नवी दिल्ली : भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हृषीकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारती यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. रुग्णालयात दाखल होण्याची त्यांनी तीन कारणे सांगितली आहेत. त्यातील एकामध्ये त्यांनी बाबरी मशीद प्रकरणावर भाष्य केलं आहे.

बाबरी पाडल्याप्रकरणी लखनऊ सीबीआय कोर्ट ३० सप्टेंबर रोजी आपला निकाल देणार आहे. २८ वर्ष जुन्या या प्रकरणात लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासोबत ३२ जण आरोपी आहेत. या सर्व आरोपींना सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांनी निकालाच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

उमा भारती यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हणाल्या, “मी आताच एम्स हृषिकेशमध्ये दाखल झाली आहे. याची तीन कारणे आहेत. १. हर्षवर्धन जी प्रचंड चिंता करत होते. २. माझा ताप रात्री वाढला. ३. एम्समध्ये माझी चाचणी केली असता अहवाल सकारात्मक आला, तर परवा लखनऊ येथील सीबीआय न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे.”

उमा भारती गेल्या काही दिवस हिमालयात होत्या. तिथे यात्रेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी प्रशासनाला आग्रह करुन कोरोना चाचणी केली, असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हिमालयात कोरोना बाबतचे सर्व नियमांचे पालन केले तरी सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटर वरुन दिली होती.