बंडखोरी सुरु :’हे’ 2 नाराज नेते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गळाला ?

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीत रंगात येण्यास सुरुवात झाली असून काल शिवसेना आणि भाजप महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता काही नेत्यांनी बंड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. काही नेत्यांनी तिकीट न मिळाल्याने बंडाचा झेंडा उगारला असून विरोधी पक्षांकडे जाण्याचा प्रयत्न सुरु केला आहे तर काही जणांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली आहे.

काल भाजपने 125 जणांची उमेदवार यादी जाहीर केली. यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने अनेक जण नाराज झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील दोन माजी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. मनसेचे माजी आमदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते  आणि माणिकराव कोकाटे हे दोघे जण राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नाशिकमधील नेते संतोष शिंदे हे देखील अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.

कोण आहेत हे आमदार

1) वसंत गीते
वसंत गीते हे मनसेचे माजी आमदार असून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते नाशिक मध्यमधून भाजपकडून इच्छुक होते, मात्र भाजपने पुन्हा एकदा देवयानी फरांदे यांना तिकीट दिल्याने ते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क साधल्याचे माहिती मिळत आहे.

2) माणिकराव कोकाटे
सिन्नरचे माजी आमदार असलेले माणिकराव कोकाटे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेल्याने त्यांनी बंडाची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत देखील पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळी देखील ते इच्छुक असून राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.

3) विलास शिंदे

अनेक वर्षांपासून कट्टर शिवसैनिक असलेले विलास शिंदे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक असून सध्या नाशिक महापालिकेत ते शिवसेनेचे गटनेते आहेत. नाशिक पश्चिम या जागेसाठी ते इच्छुक होते. मात्र शहरातील तिन्ही जागा या भाजपला गेल्याने त्यांनी देखील बंडाची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.याचबरोबर दिंडोरीतून रामदास चारोस्कर आणि  इगतपुरीतून  काशिनाथ मेंगाळ हे देखील बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

Visit : Policenama.com