भाजप नेत्याने केले बंदुकीचा धाक दाखवून स्वत:च्याच मुलीचे अपहरण

कोलकाता : वृत्तसंस्था – भाजपच्या स्थानिक नेत्यानेच आपल्या पोटच्या मुलीचे अपहरण करण्याचा कट रचला. काही महिन्यांपुर्वीच पश्चिम बंगाल मधील या नेत्याने तृणमूल काँग्रेस सोडून भाजप पक्षात प्रवेश केला होता. सुप्रभात बटव्याल असे या भाजप नेत्याचे नाव आहे. तो बिरभूम जिल्ह्यातील स्थानिक नेता आहे. त्याने चक्क स्वत:च्याच मुलीला बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केले होते. त्यानंतर या अपहरणाचा आरोप त्याने तृणमूल च्या नेत्यांवर केला होता. रविवारी बीरभूमच्या रेल्वे स्टेशनजवळ त्या मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणात आणखी दोन जणांना सुद्धा अटक करण्यात आली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , हे कृत्य कौटुंबिक समस्येतून किंवा राजकीय फायदा उचलण्यासाठी हे अपहरण केले जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, बटव्याल काही महिन्यांपूर्वीच तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामिल झाले होते. त्यांना पोलिसांनी शनिवारी संशयाच्या आधारे अटक केली. तेव्हा कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या मुलीचा पत्ता सांगितला.

आरोप केले तृणमूलच्या नेत्यांवर
भाजप नेत्याच्या मुलीच्या अपहरणानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. कारण, बटव्याल यांनी आपल्या मुलीच्या अपहरणासाठी तृणमूल काँग्रेस नेत्यांवर आरोप लावले होते. बीरभूम जिल्ह्यातील लाभपूर तालुक्यात जोरदार निदर्शने झाली. भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार आणि तृणमूल नेते मुनीरुल इस्लाम यांच्या वाहनावर हल्ला देखील केला. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच सौम्य लाठीमार सुद्धा करावा लागला. आता मुलगी सापडल्यानंतर प्रकरणाला नवे वळण लागले आहे.