ज्योतिरादित्य शिंदेंची शरद पवारांवर टीका, म्हणाले – ‘… तर तुमचाही सन्मान वाढेल’

पोलीसनामा ऑनलाईन टीम: गेल्या ३ महिन्यांपासून कृषी कायदे (farmers act २०२०) रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे राज्यसभेत (rajya sabha) कृषी कायद्यावरून भाजपचे (BJP) नेते ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia)यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करत असताना ज्योतिरात्य शिंदे यांनी शरद पवार कृषीमंत्री असताना एपीएमसीबद्दल मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्रच वाचून दाखवले. ‘काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांसाठी सुधारणा करण्यासाठी उल्लेख केला होता. त्यावेळी शरद पवार हे कृषिमंत्री होते. २०१०-२०११ मध्ये शरद पवार यांनी देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. यात त्यांनी कृषी क्षेत्रात खासगी क्षेत्राची भागिदारी गरजेची आहे. यासाठी एपीएमसी कायद्याचे संशोधन झाले पाहिजे’ असं सांगत त्यांनी शरद पवारांना आठवण करून दिली.

तसंच, ज्योतिरादित्य शिंदे यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जाहिरनाम्याचा सुद्धा उल्लेख केला. शरद पवार यांनी २०१० मध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी एपीएमसी कायद्याचा उल्लेख केला होता. पण आता ते आपल्याच विधानावरून मागे होत आहे. ही सवय आता बदलली पाहिजे. हे असं कधी पर्यंत चालणार आहे. देशासोबत असा खेळ कुठपर्यंत चालणार आहे, तुम्ही जर तुमच्या निर्णयावर ठाम राहिले तर तुमचा आणखी सन्मान वाढेल, असा सल्लावजा टोलाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी पवारांना लगावला.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या टोलेबाजीनंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही टीकेला उत्तर देत म्हणाले, ” शरद पवार यांनी त्यावेळी काय पत्रात उल्लेख केला होता त्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उत्तर देतील. पण जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा आमची चांगली बाजू मांडत होते. तशीच बाजू आज त्यांनी भाजपची मांडली आहे. वाह महाराज, आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे’ असा टोला दिग्विजय सिंह यांनी लगावला. दरम्यान, दोन्ही नेत्यांमधील जुंगलबंदी पाहण्यास मिळाली. यावर ज्योतिरादित्य शिंदे यांनीही “तुमचा सुद्धा आशीर्वाद राहु द्या”, असं म्हणत लगेच प्रत्युत्तर दिले.