Video : काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, म्हणाले – ‘राम मंदिरासाठी पैसे गोळा करतात अन्…’

भोपाळ : वृत्तसंस्था – अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सध्या देशभरातून निधी संकलन सुरु आहे. संघ परिवार आणि भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जावून स्वेच्छेने निधी गोळा करत आहेत. भाजप-संघ परिवाराच्या या अभियानावर माजी केंद्रीय मंत्री कॉंग्रेस नेते कांतीलाल भूरिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, भाजपा नेते राम मंदिराच्या नावाखाली लोकांकडून निधी गोळा करतात आणि रात्री याच पैशांंमधून दारु पितात, त्यांच्या या आरोपाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

मध्य प्रदेशात एका कार्यक्रमात बोलताना भूरिया यांनी भाजप आणि संघ परिवाराच्या अभियानावर हा आरोप केला आहे. कांतीलाल भूरिया हे मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते आहेत. ते युपीए 2 सरकारच्या राजवटीमध्ये केंद्रीय मंत्री होते. तसेच ते झाबुआमधून पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.

दरम्यान राम मंदिरासाठी निधी संकलनावरुन मध्य प्रदेशातील राजकारण तापले आहे. यानिमित्ताने मुस्लीम समाजातील वस्तींना टार्गेट केले जात आहे. या प्रकरणाची निवृत्त सचिव किंवा पोलीस महासंचलाकांकडून चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली होती. विशेष म्हणजे सिंग यांनी स्वत: राम मंदिराच्या निर्मितीसाठी देणगी दिली आहे. दिग्विजय सिंह यांचे भाऊ आणि काँग्रेस नेते लक्ष्मण सिंह यांनी मात्र या चोरांना कोणताही निधी देणार नाही, अशी घोषणा भाजपाचा संदर्भ देत केली होती.