“आम्ही देवेंद्र फडणवीसांना कधीही ‘टरबुज्या’ म्हणालेलो नाही, पण…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  “राष्ट्रवादीचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणतात, तर मला ‘चंपा’ म्हणतात. हे कसं काय चालतं,” अशी विचारणा भाजपचे चंद्रकांत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पुणे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आज पुण्यात जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांना बोलताना म्हटले की, “देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीसुद्धा टरबुज्या म्हटले नाही. पण चंद्रकांत दादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. म्हणून त्यांनी गोष्टीचा राग मानून घेऊ नये,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

कोरोनाबाबत विचारले असता पाटील म्हणाले, “कोणत्याही स्थितीत टाळेबंदी पर्याय नाही. सामान्य माणसांच्या आरोग्याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणून नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करावे. यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्यास मदत होईल.”

“राज्य सरकारवर ६७ हजार कोटी रुपयांची थकबाकी असूनदेखील सरकार विजेसंदर्भात दुरुस्तीची कामे करणार आहे. आपली व्यवस्था टिकणे महत्त्वाचे असून, आम्ही वीजबिलांबाबत मार्ग काढण्यासाठी संवेदनशील आहोत. मात्र, गेल्या सरकारने काम केले असते, तर ही वेळ आली नसती. आम्ही नक्कीच वीजबिलांबाबत मार्ग काढू,” अशी ग्वाही पाटील यांनी नागरिकांना दिली.