भाजपच्या ‘त्या’ नेत्यांनी आता फडणवीसांच्या जामीनाबाबत बोलावं, काँग्रेसचा ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले होते. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्यांना 30 मार्च रोजी पुढच्या सुनावणीसाठी हजर रहावे लागणार आहे. यावरून काँग्रेसकडून भाजप नेत्यांना टोला लगावण्यात आला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते आणि सचिन सावंत यांनी ट्विट करून म्हटले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांना खोट्या केसमध्ये गुंतवण्याचे कारस्थान करुन त्यांना न्यायालयातून मिळालेल्या जामिनावर भाजप नेत्यांनी अत्यंत हीन पातळीत टीका केली होती. त्यामुळे या नेत्यांनी आता गुन्हेगारी खटल्यात जामिनावर सुटलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला त्यावेळी पंतप्रधानांनी टीकास्त्र सोडलं होत. कोट्यावधी रुपयांची हेराफेरी करुन जामिनावर फिरणारे माय-लेक मला नोटाबंदीवर विचारतात. त्यामुळेच त्यांच्या बनावट कंपन्यांना टाळे लागले. हे दोघे मला प्रामाणिकपणा शिकवत आहेत असा टोला पंतप्रधानांनी काँग्रेसला लगावला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निमित्ताने काँग्रेसने भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.