‘भाजपचे नेते फक्त रात्रीच्या आणि पहाटेच्या गोष्टी करतात’ – नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या दिवशी १२ आमदारांची नावे घोषित होतील त्यादिवशी वैधानिक मंडळे घोषित करू, असे विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाल्यावर सभाहगृहात ठणकावून सांगितले. विकास मंडळाबाबतच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर विरोधी पक्षाने निषेध नोंदवत सभात्याग केला. दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास आजपासून मुंबईत सुरुवात झाली. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय समोर आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळावरून सरकारला धारेवर धरले.

यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांनी १५ डिसेंबर २०२० रोजी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची स्थापना केली जाईल अशी घोषणा केली होती. घोषणेला आज ७२ दिवस झाले. ती घोषणा अद्याप झाली नाही. पुरवणी मागणीच्या संदर्भात अजित पवारांनी सांगावे की विकासाचा समतोल साधलेला आहे. म्हणजे मग आज रात्री बसून आम्ही ती सगळी आकडेवारी टॅली करून बघू की खरेच विकास झाला आहे किंवा नाही. आणि समतोल विकास नसेलच, तर तसे तरी सांगावे. म्हणजे ती आकडेवारी टॅली करण्याची गरजच पडणार नाही,असेही मुनगंटीवार म्हणाले.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सुरू असलेल्या सरकारची अडवणुकीकडे लक्ष वेधले. विकास महामंडळळे आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावे जाहीर करतील त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करू, असे पवार म्हणाले.

पवारांनी १२ आमदारांचा विषय उपस्थित करताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की, दादांच्या पोटातले आता ओठांवर आले. १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातल्या लाखो लोकांना ओलीस ठेवले आहे का, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. आम्ही जे मागत आहोत, ते आमच्या हक्काचे आहे. तुम्ही आम्हाला भीक देत नाही. तुम्ही देणार नसाल, तर आम्ही भांडून मिळवू, आमचे म्हणणे ऐकले जात नसेल तर आम्ही एक मिनिट सभागृहात बसणार नाही. कामकाज रेटून न्यायचे असेल तर आम्हाला बसवता कशाला, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.

यावर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाचा धागा पकडत विरोधकांवर खोचक शेरेबाजी केली. पटोले म्हणाले की, माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की गेल्या ५ वर्षांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा बॅकलॉग वाढला का? याचीही माहिती आपण सभागृहाला दिली पाहिजे. मुनगंटीवारांच्या रात्रीच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन पटोले म्हणाले की, हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी करतात. ते तसे का करतात, मला अजून कळले नाही, असे पटोले म्हणाले. असे म्हणताच सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर हशा पिकला.