डाॅ सुजय विखेंच्या अडचणीत भर ; भाजपच्या काकडे दाम्पत्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – गेली चार वर्ष भाजपाचे काम करणारे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे व ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे या दांपत्याने भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विखे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. काकडे दाम्पत्य विखे समर्थक मानले जात असताना त्यांनी विरोधात भूमिका घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीत काकडे दाम्पत्याने भाजपच्या राजळे यांच्यासाठी त्यांच्या बरोबरीने प्रचार केला. त्या वेळी त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपची उमेदीवारी देण्याचा शब्द दिला होता. शिवाजीराव की, हर्षदा काकडे, याबाबतचा निर्णय श्रेष्ठींनी त्यांच्यावरच सोपविला होता. त्यानुसार काकडे दाम्पत्य गेली चार वर्षे भाजपचे काम नेटाने करत आहे. मात्र, गेल्या आठवड्यात नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाथर्डी येथील प्रचारसभेत मंत्री पंकजा मुंडे यांनी मोनिका राजळे यांना या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्याचे सुतोवाच जाहीरपणे केले. त्यामुळे नाराज काकडे दांपत्याने प्राजक्ता विरोधात भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार सुरू केला आहे त्याचा मोठा फटका शेवगाव तालुक्यात भाजपला बसणार आहे.

काकडे दाम्पत्य गेल्या विधानसभेला भाजपकडून इच्छुक होते. उमदेवारी अर्ज दाखल करण्याबाबत त्यांना कळविण्यातही आले होते. त्यानुसार त्यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली. तथापि, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही मिनिटे अगोदर काकडे यांना पक्षाचा ‘एबी’ फॉर्म नाकारून तो अचानकपणे आमदार मोनिका राजळे यांना देण्यात आला. त्यानंतर राजळे यांनी अर्ज दाखल केला होता.