सत्तेत सामील व्हा ! CM पदाबाबत नंतर चर्चा करू, पडद्यामागून भाजपची शिवसेनेशी जवळीक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकार स्थापनेसाठी दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक असताना राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या संबंधी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहेत. भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा जागा कमी मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी वारंवार संघर्ष करावा लागत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि शिवसेनेमध्ये एका मध्यस्थि व्यक्तीच्या माध्यमातून पडद्यामागून चर्चा सुरु आहे. यानुसार शिवसेनेला सत्तेत सामील होण्यासाठी सांगण्यात आलेले आहे. तसेच सत्ता स्थापनेनंतर पुढील महिन्यात केंद्रीय नेतृत्वांशी बोलून मुख्यमंत्री पदाबाबत तोडगा काढू असे देखील शिवसेनेला सांगण्यात आल्याचे समजते.

तसेच मध्यस्थी केलेल्या नेत्याने हे देखील सांगितले की, जर शिवसेना आपला मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडत असेल तर भाजप शिवसेनेला अनेक महत्वाची खाती देण्याबाबत सुद्धा विचार करेल. तसेच जर पूर्ण बहुमत हातात नसेल तर भाजप सत्ता स्थापनेवर देखील दावा करणार नाही.

शिवसेनेच्या संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर पवार यांनी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे देखील स्पष्ट केले होते. तसेच जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला असल्याने त्याचे पालन करणार असल्याचे देखील शरद पवार यांनी सांगितले होते. संजय राऊत यांनी 170 आमदारांची एक यादी दाखवून यांचा आम्हाला पाठींबा असल्याचे पवारांनी सांगितले होते. मात्र हा आकडा त्यांच्याकडे कसा आला हे माहित नसल्याचे शरद पवार म्हणाले होते.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास शिवसेना जबाबदार नाही –

संजय राऊत यांनी शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी अग्रेसर आहे आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे देखील वारंवार स्पष्ट केले आहे. तसेच जर लवकर सत्ता स्थापनेवर तोडगा निघाला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि याला शिवसेना जबाबदार नसेल असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Visit : Policenama.com