… म्हणून पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर BJP ‘नाराज’, दिल्लीत ‘तक्रार’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपासून नाराज पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावरुन सर्मथकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. भर मंचावर मनातील खदखद बोलून दाखवल्यानंतर पक्षाच्या बाबी मंचावर मांडल्याने भाजप नेतृत्व पंकजा मुंडेंवर नाराज असल्याचे कळाले. आता पंकजा यांची तक्रार दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडे करणार असल्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूका पार पडल्यानंतर पराभव झाल्याने आता भाजपमधून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु होते. यानंतर पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरुन त्यांनी समर्थकांना संबोधित केले. दरम्यान फडणवीस यांच्यावर नाव न करता टीका केली. त्यांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे भाजपमधील नेते वरिष्ठ नेत्यांवर नाराज आहेत. राज्यात मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सक्रीय होण्याचे मुंडेंनी आज जाहीरपणे सांगितले. परंतू मुंडेंची ही जाहीर भूमिका पक्षाच्या पचनी पडली नाही.

बीडमध्ये समर्थकांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर पंकजा मुंबईत दाखल झाल्या. त्यांच्या नाराजीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी मोजक्या शब्दात सूचक उत्तर दिले. मी आता पक्षांच्या कोअर कमिटीची सदस्य राहिली नाही असे त्या म्हणाल्या. गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे
पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर म्हणाल्या की मी एक मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असून, सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले गोपीनाथ मुंडेंचे स्मारक बनवू नका. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा आणि चांगला सधन शेतकरी तयार करण्यासाठी योगदान द्या. 27 जानेवारीला औरंगाबादला मी लाक्षणिक उपोषण करणार असून, मराठवाड्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचेही पंकजा मुंडेंनी सांगितले. पाच वर्षांत जे केले त्याला पुढे नेण्यासाठी या सरकारचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करत होते असे सांगताना पंकजा मुंडे म्हणाल्या की एक एक आमदार पक्षाला देण्यासाठी मी वणवण फिरत होते. पक्ष ही प्रक्रिया असते. पक्षावर कुणाचीही मालकी नसते. अटलजी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि आता अमित शाह यांच्या सारख्यांनी अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा वाहिली आहे. पक्ष हा कोणाही एका व्यक्तीचा नाही, अशी आक्रमक भूमिका मांडत राज्य नेतृत्वाला त्यांनी लक्ष केले.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/