‘आधी परिवार सांभाळा’, राष्ट्रवादीच्या मिशन ‘घरवापसी’वर भाजपचा पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी मिशन घरवापसीच्या मुद्यावर भाजपने पटलवार केला आहे. भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीने आधी आपलं घर सांभाळावं आणि नंतर भाजपवर बोलावं. आपला पक्ष फुटू नये म्हणूनच राष्ट्रवादीचे नेते अशा पद्धतीने अफवा पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शेलार यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या घरातला भेद आणि विसंवाद लपवण्यासाठी भाजपचे आमदार राष्ट्रवादीत परत येणार अशा अफवा पसरवण्याचं काम राष्ट्रवादीकडून अतिशय योजनाबध्द पद्धतीने सुरु आहे. या प्रयत्नाला कोणतंही यश मिळण्याची शक्यता दुरान्वयेही नाही. जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात जरी संवाद साधला तरी खूप आहे, असा खोचक टोला शेलार यांनी लगावला आहे.

आधी स्वत:चं सरकार आणि स्वत:चा पक्ष वाचवा असंही ते म्हणाले, भाजपला ना कोणाचा परिवार फोडण्याची इच्छा नाही ना सरकार पाडापाडीत रस आहे, असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक सांगितले की, भाजपमध्ये जे आमदार गेले त्यांना तिथं किंमत नाही. त्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादीत येऊ पहात आहेत. हे आमदार शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत संपर्कात आहेत. असे आमदार स्थानिक राजकारणाचा विचार करून पक्ष प्रवेश करत आहेत, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.