कोलाष्टक संपले.. भाजपची यादी आज होणार जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलाष्टक काळ असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला प्रचार थांबविला होता. हा कोलाष्टक काळ संपल्याने आता भाजपच्या देशभरातील किमान २५० उमेदवारांची यादी एकाचवेळी जाहीर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमधील सर्व खासदारांना नारळ देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

या यादीमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जागांवरील उमेदवारांची घोषणा प्रामुख्याने होणार आहे. उत्तर प्रदेशातील ३५, बिहारमधील सर्व १७, महाराष्ट्रातील २१, उडिसा, झारखंड, छत्तीसगडमधील १५ कर्नाटक आणि जम्मू काश्मीरमधील १२, राजस्थान, बंगामधून जवळपास २७, केरळ, तामिळनाडू, आसाम, त्रिपुरा, तेलंगणा, अरुणाचल प्रदेशच्या सर्व, उत्तराखंडच्या सर्व पाच जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते. गाझियाबादमधून जनरल व्ही. के. सिंह, नोएडातून महेश शर्मा, मथुरेतून हेमामालिनी यांची नावे निश्चित मानली जातात. आसनसोलमधून बाबुल सुप्रियो, तृणमूलमधून आलेले सौमित्र खान आणि अनुपम हाजरा यांची नावेही निश्चित मानली जातात. दार्जिलिंगच्या एस. एस. अहलुवालियांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील.

छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर इथे एकाही विद्यामान खासदाराला तिकिट द्यायचे नाही, असा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. १५ वर्षं सत्तेत असलेले भाजप सरकार सत्ता टिकवणार, अशी खात्री असताना पक्षाने या राज्यात सर्वाधिक मार खाल्ला होता. विधानसभेच्या ६८ जागांपैंकी केवळ १५ जागा पक्षाला जिंकता आल्या.