भाजपला दक्षिण विजय अशक्य ; केवळ १७ जागांचा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तरेत कमी होणाऱ्या जागा दक्षिणेत भरुन काढण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे. त्यासाठी तामिळनाडु, आंध्र प्रदेशात चांगल्या जागा मिळविण्याचे भाजपने ठरविले आहे. मात्र, टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरबरोबर केलेल्या सर्व्हेतून भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण भारतातल्या १३१ जागांपैकी भाजपला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागू शकते अशी शक्यता या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आली आहे.
त्याचवेळी काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षांना २०१४ च्या तुलनेत चौपट जागा (७१) मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जानेवारीमध्येच हा सर्व्हे करण्यात आला असून, या सर्वेक्षणातून वेगवेगळ्या राज्यांतील निकालासंदर्भात अंदाज वर्तवण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा आहेत. तिथे आता निवडणुका झाल्यास काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला मोठा फायदा पोहोचू शकतो. यूपीए ३९ पैकी ३५ जागांवर विजय मिळवेल, अशीही शक्यता व्यक्त केली आहे. तर एआयएडीएमके चार जागांवर विजय मिळवेल, असे चित्र आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला इथे खातेही उघडता येणार नाही.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने ३७ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांना खातंही उघडता आले नव्हते. भाजपा युती आणि इतरांच्या खात्यात १-१ जागा गेली होती.

आंध्र प्रदेशात लोकसभेच्या २५ जागा आहेत. जर आज निवडणूक लागल्यास वायएसआर काँग्रेस २३ जागांवर विजय मिळवेल. तेलुगू देसम पार्टी फक्त २ जागा जिंकेल. इथे भाजपा आणि काँग्रेसला खाते उघडणेही अवघड आहे. २०१४ च्या निवडणुकीत टीडीपीने १५ जागा जिंकल्या होत्या. तर वायएसआर काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाला केवळ दोन जागा मिळवल्या होत्या.
केरळमध्ये लोकसभेच्या २० जागा आहेत. जर आता निवडणुका झाल्यास भाजपाचे खाते उघडू शकते. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ १६ जागांवर विजय मिळवेल. कम्युनिस्टांना तीन जागा राखण्यात यश येईल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत यूडीएफने १२ जागा जिंकल्या होत्या. एलडीएफने ८ जागांवर विजय मिळवला होता.