महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रँड ? हे काय नवीन काढलं ?, चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे ब्रँडवरून केलेल्या वक्तव्यानंतर मनसे पेटून उठली होती. मनसेच्या अनेक नेत्यांनी यावरून शिवसेना, राऊत आणि सीएम ठाकरेंवर टीका केली होती. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड ? हे काय नवीन काढलं ? असा सवाल त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीसोबत ते बोलत होते.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, राज्यात फक्त ठाकरे ब्रँड आहे. हा ब्रँड घालवण्याचा काही लोकांचा डाव आहे असा आरोपही त्यांनी केला होता. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत या ब्रँडची खिल्ली उडवली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “ठाकरे ब्रँड ? हे काय नवीन काढलं ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच ब्रँड आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताच ब्रँड नाही.

ठाकरे ब्रँडसाठी शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते महणाले की, ठाकरे यांनी शिवसेनेच्या हाकेला प्रतिसाद द्यावा किंवा नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. मनसेच्या एका नेत्यानं शिवसेनेला कडक शब्दात प्रत्युत्तर दिलंही आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.