‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यभरात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले. यानंतर संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याच दरम्यान भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत काही रोखठोक सवाल विचारले आहेत. पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार ? सत्य जनतेला कधी कळणार ?, असे सवाल उपस्थित करत भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजप महाराष्ट्राने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन काही ट्विट केले आहेत. या ट्विटच्या माध्यमातून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. याशिवाय काही प्रश्न उपस्थित केले आहेत. काल संजय राठोड यांनी राजीनामा दिला खरा पण आता ठाकरे सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का ? ठाकरे सरकार त्यांची चौकशी कधी करणार ? आणि चौकशीत राठोड हे दोषी आढळले तर त्यांच्यावर निष्पक्षपातीपणाने कारवाई होणार का ? हे खरे प्रश्न आहेत, असे ट्विट भाजपने केले आहेत.

मंत्रीपद सोडलं… आमदारकीचं काय ?

भाजपने आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ? बराच गदारोळ माजल्यानंतर शिवसेनेने संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला. पण आता आमदारकीचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ? असा सवाल केला आहे.

पूजा चव्हाण यांची आत्महत्या, हत्या की घातपात

पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार ? सत्य जनतेला कधी कळणार ? असा घणाघात सरकारवर केला आहे. फक्त राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

कारवाईत चालढकल का केली ?

फक्त संजय राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करावीच लागेल. याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील. तरच पूजा चव्हाण यांनी आत्महत्या केली, हत्या झाली की घातपात हे समजेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली ? असा सवाल भाजपने केला आहे.

पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करत होते ?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, कोणताही गुन्हा दाखल न करता पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करत होते ? कुणाची चौकशी करत होते ? असा सवाल शेलार यांनी केला आहे.