धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपा महिला मोर्चा आक्रमक, सोमवारपासून रस्त्यावर उतरणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुंडेच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपच्या महिला मोर्चा आक्रमक झाल्या असून सोमवार (दि. 18) पासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. यासंदर्भात त्यांनी एक प्रसिद्धीपत्रकही जाहीर केले आहे.

सामाजिक न्याय या सारखे मंत्रीपद भूषविणाऱ्या मुंडेनी आपल्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनेच आपण सदर महिलेशी संबंध ठेवले, तिच्यापासून झालेल्या मुलांना आपले नाव दिले, याची कबुलीही मुंडेंनी दिली आहे. मंत्रीपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असेल तर त्यातून समाजाला काय संदेश जातो आहे, याचा विचार करावाच लागणार असल्याचे उमा खापरे म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येतील, असेही खापरे यांनी या पत्रकात नमूद केले आहे.